औरंगाबाद: पैठण येथील मीरा हॉटेलमध्ये काल रविवारी रात्री किरकोळ कारणावरून वाद झाला. त्यामध्ये तीन जणांनी एकावर पिस्तूल रोखल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी पैठण पोलिसांनी अद्याप गुन्हा दाखल केलेला नाही. याबाबत माहिती देण्यास नकार देत पोलिस हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करत आहेत.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पैठण येथील अरुण बलैय्या हे मीरा हॉटेलमध्ये रविवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास जेवण करण्यासाठी गेले होते. त्यादरम्यान तेथे तीन जण आले. त्यांनी किरकोळ कारणावरून अरुण बलैय्या यांच्यासोबत वाद घातला. एकाने कंबरेजवळ ठेवलेले पिस्तूल काढून अरुण बलैय्या यांच्या कानशिलात लावली. पिस्तूल कानशिलात लावताच बलैय्या यांनी आरडाओरड केली. हा प्रकार पाहून हॉटेलमधील सर्व जण भयभीत झाले. हॉटेलचालकाने वेळीच हस्तक्षेप करत पिस्तूल रोखणार्याला विनंती केली. हॉटेलचालकाच्या मध्यस्थीने हा वाद जागीच मिटला.
याप्रकरणी अरुण बलैय्या यांनी पैठण पोलिस ठाण्यात अज्ञात तीन जणांविरुद्ध तक्रार दिली आहे. याबाबत पैठण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक भगीरथ देशमुख यांना विचारणा केली असता त्यांनी मात्र एअर पिस्टल असल्याचे सांगितले. अधिक माहिती देण्यास त्यांनी नकार दिला.